राफेल घोटाळ्याचे रहस्य मनोहर पर्रिकरांच्या बेडरुममध्ये?

Foto

नवी दिल्‍ली- राफेल विमान खरेदीत झालेल्या घोटाळ्याशी संबंधित फायली माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे  विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या बेडरूममध्ये असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्‍ते रणदीप सुरजेवाला यांनी केला. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल प्रकरणी एका मुलाखतीत स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतर ही काँग्रेसचे समाधान न झाल्याने आज काँग्रेसने भाजपवर जोरदार हल्‍ला चढविला. लोकसभा निवडणुकीपर्यंत राफेल मुद्दा चर्चेत राहणार असल्याचे दिसते. 

 

राफेल विमान घोटाळ्यावरून काँग्रेसने आता पंतप्रधान नरेंद्र मोदींसह तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरांवर निशाणा साधला आहे. राफेल घोटाळ्याचे रहस्य मनोहर पर्रिकरांच्या बेडरूममध्ये असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. राफेलबाबत पर्रिकरांकडे मोठी माहिती असून ती बाहेर यायला हवी अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे. देशाचा चौकीदार चोर असल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला.

 

माध्यमांशी बोलताना सुरजेवाला यांनी कॅबिनेट बैठकीतील पर्रिकर यांच्या एका वक्तव्याचा दाखला यावेळी दिला. परंतु, त्यांनी हे कधी म्हटले होते हे सांगितले नाही. मला कोणीही काही करू शकत नाही.. माझ्याकडे राफेल घोटाळ्याची माहिती आहे, असे पर्रिकर म्हणाल्याचे सुरजेवाला यांनी सांगितले. पर्रिकरांकडे राफेल घोटाळ्याशी संबंधित मोठी माहिती आहे. ती समोर आलीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

 

मोदी एकटे फ्रान्स, पॅरिसमध्ये गेले होते. त्यांच्या शिष्टमंडळात अंबानी होते. पण आपले संरक्षण मंत्री त्यावेळी गोव्यात मासे खरेदी करत होते. याची चौकशी व्हायलाच हवी. मोदी हे संयुक्त संसदीय समितीच्या चौकशीपासून वाचण्याचा प्रयत्न करत आहेत. ते समितीलाही कागदपत्रे दाखवायला तयार नाहीत, असे सुरजेवाला यांनी म्हटले.

 

शिवसेनेकडून पर्रिकरांचे कौतुक

 

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना पॅनक्रिएटिक कॅन्सर आहे. आजारपणातही विविध कार्यक्रमांना हजेरी लावून विरोधकांनाही बोलके केले आहे. विरोधक त्यांच्या या दौर्‍यांवर टीका करत असताना शिवसेनेने त्यांच्या कार्याचे कौतुक केले. काम न करणार्‍या मंत्र्यांनी पर्रिकरांचा आदर्श घ्यावा असे शिवसेनेने म्हटले आहे. कित्येक दिवस उपचारासाठी सार्वजनिक सभांमधून गैरहजर राहणारे पर्रिकर सोमवारी आपल्या सचिवालयात दिसून आले. त्यांनी सचिवालयात जाऊन राज्य सरकारच्या कामाचा आढावा घेतला.